मैत्री
मैत्री हा केवळ एक शब्द नसून त्यात सारं जग सामावलेले आहे. 'सुख' या शब्दाला जर कुठला समानार्थी शब्द असेल, तर तो आहे "मैत्री".
मैत्रीसारखी अमूल्य गोष्ट साऱ्यांचाच आयुष्यात हवी, कारण या मैत्रीमुळेच अवघडातली अवघड वाटदेखील सुखकर आणि सोपी वाटू लागते.
मला जर कोणी विचारले की मला आयुष्यात सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट कुठली वाटते - तर माझे उत्तर असेल - चांगले मित्र-मैत्रिणी; कारण - अन्न, वस्त्र आणि निवारा इतकंच तेही जीवनावश्यकच आहे ना!
माझ्या नशिबानी आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला खूप चांगले मित्र मिळाले. वर्ष पुढे सरकू लागली तश्या नवीन नवीन मैत्री झाल्या.
पण नवीन मित्र-मैत्रिणी मिळत गेले तरी जुन्या मैत्रीदेखील आठवणीत कायम राहतील. आधीच्या मैत्रिणींबरोबर केलेली मजा अजून आठवते.
अजूनही अचानक पूर्वीची कोणी मैत्रीण भेटली तर त्या पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळतो आणि चेहऱ्यावर हसू उलगडते.
मैत्री विशेष असते कारण त्यात सगळे समान असतात. कोणीच लहान नसते, कोणीच मोठे नसते, कोणीच उच्च नसते तर कोणी नीचही नसते; सगळे असतात ते केवळ मित्र आणि मित्रच.
मला वाटते की मैत्री ही दोन लोकांमधली नसून ती दोन विचारांना जोडणारा एक धागा असते. खऱ्या मैत्रीमध्ये एकमेकांबद्दल नकारात्मक भावनांना जागाच नसते.
खऱ्या मैत्रीमध्ये आपण एकमेकांच्या सुखांसाठी काहीही करायला तयार होतो, आणि एकमेकांच्या फक्त भल्याचाच विचार करू शकतो.
खऱ्या मैत्रीमध्ये कधीच ego (अहंकार) आड येत नाही. खऱ्या मैत्रीला कोणाच्या साक्षिची गरज नसते, कारण इतर जगाला इथे काहीच prove करायचे नसते.
खरी मैत्री तीच असते जिथे शब्दांशिवाय भावना एकमेकांपर्यंत पोहोचतात; जिथे मनातल्या भावना आपोआप उमगतात; जिथे सुख-दुःख हसण्या-रडण्यातून व्यक्त करावे लागत नाहीत; जिथे मोकळॆपणाने काहीही बोलता येते (मन मोकळे करता येते).
खऱ्या मैत्रीवर वेळ आणि अंतर या दोघांचाही कधीच परिणाम होऊ शकत नाही.
मैत्रीमुळे आयुष्याला अर्थ मिळतो, सुख-दुःख अथवा कुठलीही भावना असो - व्यक्त करायला एक जागा मिळते. मैत्रीमुळे स्वतःची नवीन ओळख मिळते, जगण्याच्या नवीन वाटा दिसू लागतात, आत्मविश्वास वाढतो.
शब्दात व्यक्त न होऊ शकणाऱ्या भावनासुद्धा व्यक्त होतात.
तसं 'मैत्री' या विषयावर लिहायला गेलं तर एक पुस्तकही कमीच पडेल. पण पु. ल. देशपांडे यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर -
मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही.
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही; पण मी तुला विसरणार नाही हि झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.
शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातला माणूसपण जाणलं...